Wednesday, January 17, 2007

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग# २५. )

|श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # २५.

जाणीव नेणीव भगवंती नाही । हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कलिकाळाचा रीघ नाही ॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसी केविं कळे ॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असें ॥

पाठभेदः हरिउच्चारणी = उच्चारणीं

नामाचा महिमा अगाध आहे ह्यात शंकाच नाही. हरीला आपले नाममाहात्म्य किती प्रिय आहे हे ज्ञानदेव आपल्याला ह्या अभंगातून सांगत आहे. नवजात अर्भक जरा जरी रडले तरी त्याची आई पटकन आपल्या हातातील सारी कामे बाजूला सारून धावत आपल्या बाळाकडे लक्ष देते. गाढ निद्रेत असली तरी ती उठून आपल्या बाळाकडे लक्ष देते. त्याच्या रडण्याचे कारण नेमके काय आहे हे जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न करते. अगदी त्याचप्रमाणे भक्ताच्या / नामधारकाच्या मुखात भगवंताचे नाम आले की भगवंत नामधारकाची काळजी घेतोच. असा नामधारक तत्काळ निर्भय आणि निश्चिंत होतो. भगवंताच्या स्मरणाचा अनुभव असा रोकडा आहे. म्हणूनच तर संतजन विठूमाऊली असा विठ्ठलाचा धावा करतात. दुसऱ्या अंगाने विचार केला तर विदर्भातील साधू श्री. गुलाबराव महाराज यांच्या खालील ओवीही याचेच प्रमाण देतात.
'अमृत अवचट मुखीं पडले । तरि काय म्हणावे मरण न चुकले ॥
तैसे अवचट हरिनाम वदनीं आले । तरि होय दहन महादोषा ॥'
'वस्तु शक्तीच्या ठायीं । श्रद्धेची अपेक्षा नाही ॥
नाम 'वस्तुतंत्र' लवलाही । वचन सिद्ध ॥'

नाम कसेही घेतले तरी ते मोक्षाचे फळ देणारच. दुसरे म्हणजे, नाम घेणारा जरी अज्ञ असला तरी ज्याचे नाम घेतो तो तर सुज्ञ आहे. घेणारा अल्पज्ञ असला तरी ऐकणारा सर्वज्ञ आहे आणि घेणारा जरी एकदेशी असला तरी नामी सर्वव्यापी आहे की. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंत नामात सूक्ष्म रूपाने वास करून असतो.
'तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥'
म्हणूनच नामाचा उच्चार केल्याबरोबर सुज्ञ, सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान अशा भगवंताचे लक्ष वेधले जाते. नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे वळते आणि नामधारकाला प्रभूकृपेने मोक्ष तर मिळतोच पण त्याच्या जीवनात प्रभू प्रगट होऊन नामधारकाचा आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक योगक्षेम स्वतः वाहतो.
'तुका म्हणे यासी नामाचा अभिमान । जाईल शरण त्यासी तारी ॥'

नारायण हरि उच्चार नामाचा । तेथे कलिकाळाचा रीघ नाही ॥

नामधारकाचे एक वैशिष्ट्य असते. तो नेहमी भगवंताच्या स्मरणात जीवन जगत असतो. त्याची खूण म्हणजे त्याच्या मुखात अखंड नाम चालू असणे. त्याच्या स्मरणात भगवंताशिवाय काही नसतेच. द्वैतभावच नसेल तर मग वाईट विचार तरी कुणाबद्दल असणार आणि देहभावच सरला तर मग काळाची तरी भीती का असावी? भगवंताच्या कृपेने श्रद्धायुक्त अभ्यासाने नामधारकाच्या अंतःकरणात नाम स्थिरावते आणि त्यामुळे त्याच्या जीवनात वाईट काळ येतच नाही.

यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरुनि उठविली । यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ज्ञानेश्वऱीतील ह्या ओव्या आणखी वेगळे काय सांगतात?तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसी केविं कळे ॥ही ओवी वाचताना ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी'त लिहिलेल्या नवव्या अध्यायातील ओव्या आठवाव्याश्या वाटतात.
परि प्राणियांचें दैव कैसे । जे न देखती मातें ॥ ३०० ॥
ज्ञानेश्वरीही ज्ञानदेवांनीच लिहिली आहे. पण ती 'भगवंताच्या' भूमिकेतून. हरिपाठात मात्र ज्ञानदेव साधकाच्या / अभ्यासकाच्या भूमिकेतून हे लिहितात असे वाचकांच्या निदर्शनास आणून द्यावेसे वाटते.
ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील खालील ओव्या ह्या ओवी संदर्भात चिंतनीय आहेत.
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।
जे वेदांचियां चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥

जेथ नाना मतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जे पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥

पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।
तयांचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ २७५ ॥

जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसीं ।
जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥

म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु ।
एंव मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥

नामाचा यथार्थ महिमा प्रत्यक्ष वेदांनाही आकळत नाही. चैतन्याचा विराट सागर विश्वाच्या अतीत आहे. जेव्हा तोच विश्वभाव ग्रहण करतो तेंव्हा तो शक्तिरूपाने प्रत्ययास येतो. तेच शक्तिरूपी स्फुरण संतांच्या ठायी 'नाम'रूपाने वास करीत असते. संत तुकाराम महाराज तर देवालाच कौतुकाने म्हणतात,
'तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ॥'
तुलसी रामायणात तुलसीदासांनीही असेच उद्गार प्रभू रामचंद्रांना उद्देशून काढले आहेत.

तात्पर्य हेच की नामाचा महिमा जेथे वेदांनाही आकळत नाही तेथे इतर जडबुद्धिच्या स्थूल दृष्टीच्या लोकांना कसा कळणार? ज्या शरीराच्या आधाराने आपण आपली ओळख करून देतो. ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत असे आपल्याला वाटते त्या शरीराबद्दल तरी आपल्याला कुठे काही माहीत आहे? तरीही आपण जगतोच ना? मग परमेश्वराबद्दल आपले अज्ञान किती प्रचंड आहे ह्याची कल्पनाही न केलेली बरी. पण ज्यांना ह्याची जाणीव झाली अशा सामान्य माणसांनी संतांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून नाम घेत राहावे म्हणजे एक दिवस त्या भगवंताचे दर्शन होईलच.ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असें ॥नामाचा महिमा गाऊन झाल्यानंतर ज्ञानदेव आता नामाची फलश्रुती नेमकी कशात आहे हे वाचकांना सांगत आहेत. भगवन्नामाच्या पाठाचे फळ म्हणजे 'सर्वत्र वैकुंठ' असे दृष्टीस पडणे. भवरोगाने त्रस्त झालेल्या साधकाला जगाचे खरे दर्शन घडतच नाही. मनोरुग्णाला कळते का की तो रोगी आहे? तसेच सामान्य माणसाला कितीही सांगितले की तो भवरोगाने त्रस्त आहे तरी त्याला हे पटणार नाही. नामाच्या उच्चाराने साधक भवरोगातून मुक्त होतो. त्याला जी दिव्य दृष्टी प्राप्त होते त्या दिव्यदृष्टिला सर्व जग म्हणजे प्रभूचा विस्तार, विश्व म्हणजे परमात्म्याचा चिद्विलास, भूतमात्र म्हणजे चैतन्याची शोभा असा अनुभव प्राप्त होतो.

ज्या नामाने ज्ञानदेवांना हा अनुभव प्राप्त झाला तोच अनुभव तुम्हा-आम्हाला यावा म्हणून ज्ञानदेव आवर्जून सांगतात...


हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)

अभंग # २६.

एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥
नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥

पाठभेदः जपे = जपा

हरिपाठाला सुरुवात केली तेंव्हा पहिल्याच अभंगात ज्ञानदेव सांगतात,"हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥" आणि आता हरिपाठाचा उत्तरार्ध जवळ आला असता ते सांगतात,"एकतत्त्व नाम दृढ धरी मना." आपल्याही नकळत हरिनाम मुखातून मनापर्यंत पोहचले. नामधारक अंतर्मुख झाल्याची ही खूण आहे.

सुरुवातीला नाम हे साधन आहे नामधारकाचे. पण नाम घेता घेता अनुभव हा येऊ लागला की नाम हेच तत्त्व आहे. 'नाम-नामी अभेद' हा संतांचाही अनुभव आहे. नाम हे परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. भगवन्नाम आकाराला येण्यासाठी स्वस्वरूपात शुद्ध स्फुरण व्हावे लागते व यासाठी आत्मतत्त्वाला आपल्याच अंगी असणाऱ्या शक्तीचा आलंब घ्यावा लागतो. लाट ही पाण्याचे स्फुरण असल्यामुळे ती अंतर्बाह्य पाणीरूप आहे. त्याचप्रमाणे नाम हे परब्रह्मस्वरूप आत्मतत्त्वाचे स्फुरण असून ते ब्रह्मरूप आहे. भगवंताचे ते अतिसूक्ष्म रूप आहे. म्हणूनच सर्व संतांनी नामाचा अनुभव घेऊन ते तत्त्वरूप-चैतन्यरूप-ब्रह्मरूप आहे असे जगाला हाकारून सांगितले.
नामा म्हणे नाम आठवा अवतार । पूर्णब्रह्म साचार कृष्णरूप ॥
नाम ते ब्रह्म नाम ते ब्रह्म । नामापाशी नाही कर्म विकर्म ॥

हे मना ! तू जर दृढतापूर्वक नाम धरलेस तर हरिला करुणा येणारच. ज्ञानदेवांनी येथे 'दया' हा शब्द का वापरला नाही ह्याचा मी विचार करत होतो. दया आणि करुणा हे शब्द बऱ्याच वेळा आपण समानार्थी वापरतो. मी, ह्या दोन शब्दांमध्ये, थोडा फरक करतो. आपण 'दयेची भीक' मागतो. पण कधी करुणेची भीक मागतो का? बाह्यता जरी समान दिसले तरी त्यामागील भाव वेगळा असावा असे वाटते. 'दया' ह्या भावात उपकाराची छटा असते तर 'करूणा' मध्ये आपलेपणाची. 'दया' दाखवताना आपण ती इतर कुणालातरी दाखवत असतो. 'करुणा' मात्र आपल्या जवळच्या कुणाबद्दल तरी वाटते आपल्याला. आईच्या ठायी आपल्या लेकराबद्दल असते ती करुणा आणि इतरांबद्दल असते ती दया. मन हे त्या परब्रह्माचाच अंश आहे असे तर नाही ना ज्ञानदेवांना सुचवायचे?

तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥

नाम हे सुलभ आहे, सहज आहे, सोपेही आहे. तरी सामान्यता माणूस ते घेत नाही. हे साऱ्या संतांचेच दुःख आहे. नाम कसेही घेतले तरी ते फळते हे जरी खरे असले तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळते. असा नापजप होण्यासाठी नामाचे स्वरूप आणि त्याचा महिमा समजला पाहिजे. हे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणूनच संत एकमुखाने सद्गुरूमहिमा गातात.
'सद्गुरूवाचोनि नाम न ये हाता । साधनें साधिता कोटी जाणा ॥'
'संतांसी शरण गेलियावांचोनि । एका जनार्दनी न कळे नाम ॥'
नामाच्या रूपाने प्रभू आपल्याजवळ आहे. नामस्मरणाने भगवत्कृपा होऊन तो आपला सर्वप्रकारे योगक्षेम वाहतो हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामजप करणे म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणे होय.

नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥

नाम हे साधन न राहता एक तत्त्वच आहे हे ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ज्ञानेश्वरीतही ज्ञानदेव १०व्या अध्यायात लिहितात,
अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा ।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥

समस्तांही यज्ञांचा पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं ।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ २३२ ॥

नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्‍नानादि कर्म ।
नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥
आपला (जीवनातील) अनुभव हा आहे की साधनाच्या अंगाने जाता साध्य पदरात पडते आणि मग साधन संपते. नामाच्याबाबतीत मात्र असे होत नाही. नाम घेणारा 'मी' आणि ज्याचे नाम घेतो तो 'भगवंत' ह्यांचे अद्वैत असते. म्हणून नाम घेता घेता 'मी' भगवंतामध्ये विलीन होतो आणि अखेर नामच शिल्लक उरते. अशी प्रचिती येण्यासाठी मात्र धीर हवा. धीर नसेल तर उतावळेपणाने साधक दृश्यातील प्रचितीच्या मागे जातो. इतर मार्गांत थोडी साधना झाली की छोट्या-मोठ्या प्रचिती येतात आणि साधक त्यांच्याच नाही लागतो. असे घडू नये म्हणून ज्ञानदेव नामधारकांना धोक्याचा इशाराच देत आहेत. नामाचे अंतिम ध्येय काय असावे आणि अनुभूती काय असावी हे पुढच्याच ओवीतून ते स्पष्ट करतात.

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥

संत कबीरांचा नामस्मरणाबाबतचा अनुभव त्यांनीच शब्दबद्ध केला आहे तो असा..
"राम हमारा जप करे । हम बैठे आराम ॥"
आणि आता ज्ञानदेवही त्यांचा अनुभव शब्दबद्ध करतात तो "ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥" असा. ह्या दोन्ही संतांचा / नामधारकांचा अंतरीचा अनुभव हा एकच होता हे आपल्या ध्यानात येईल. प्रामाणिकपणे, अखंड आणि निष्ठापूर्वक मुखाने हरी हरी म्हणता साधकाला शेवटी वरील अनुभव येतोच.

सर्वसामान्यता साधक वैखरी, मध्यमा आणि पश्यंती ह्या वाणीतच जप करतो. त्याच्याही पलीकडे असते ती परावाणी. परावाणीत चालणारा जप हा स्फुरद्रुप असतो. हा जप करावा लागत नाही. तर केवळ ईश्वरी कृपा किंवा सद्गुरूकृपा झाली तरच असा जप नामधारकाच्या अंतरी चालतो. संत तुकाराम महाराजांसारखा अखंड जप आपण करू शकत नाही. मग ईश्वरी कृपेची अपेक्षा आपण कशी करावी? मात्र असाच अनुभव सद्गुरू आपणाला देऊ शकतात. किंबहुना असा अनुभव साधकाला देऊन त्याच्या साधनेची दिशा नक्की करतात तेच खरे सद्गुरू! ईश्वरी कृपेने परावाणी उघडली की नामधारकाला असा अनुभव येतो की नामजप प्रत्यक्ष न करताही अंतरात नामजप आपोआप चालू आहे. परावाणी उघडल्यावर 'देव' जप करतो आणि 'मी' तो आरामात बसून ऐकतो असा अनुभव नामधारकाला येतो. असा अनुभव नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टहासाने अखंड नामस्मरण करीत राहावे लागते. म्हणूनच ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतात...हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

Tuesday, January 16, 2007

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२७)... अंतिम

अभंग # २७.

सर्वसुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहें ॥
निजवृत्ती हें काढी सर्वमाया तोडी । इंद्रियांसवडी लपो नको ॥
तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥

भिन्नपाठः साही = सर्व; रामकृष्णी = कृष्णनामी

हा अभंग म्हणजे "एक अभंगी हरिपाठ"च आहे. हरिपाठावर लिहायला सुरुवात केली तेंव्हा पहिल्या अभंगाचा आस्वाद घेताना मी लिहिले होते...

आधुनिक शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास हरिपाठ हा "ज्ञानियांच्या राजांचा" अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक शोधनिबंधच आहे. एखाद्या scientific journal मध्ये जेंव्हा शोधनिबंध प्रसिद्ध होतो तेंव्हा प्रामुख्याने Abstract, Methods & methodology, results आणि शेवटी conclusion अशा ४ भागात ढोबळमानाने लिहिलेले असते. ह्या धर्तीवर म्हणायचे झाल्यास अभंग#१ हा ज्ञानदेवांच्या शोधनिबंधातील abstract म्हणायला हरकत नसावी. त्यांचे हे लेखन ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीयलेखनच आहे हे म्हणायला भरपूर वाव आहे.

हरिपाठात नामस्मरण साधनेची सुरुवात,
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
अशी होऊन नामसाधनेने साधक अंतर्मुख होऊन त्याला २६व्या अभंगात "एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥"
अशी अनुभूती येऊ लागते. त्याच अभंगात ज्ञानदेव नामस्मरण साधनेतील परिणाम(result)सांगतात,
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥

आता २७ व्या अभंगात ज्ञानदेव नामसाधनेवरील शोधनिबंधात आपले निष्कर्ष (conclusion) देतात.

सर्वसामान्यपणे 'देव' ह्या संकल्पनेबाबत दोन वर्ग आहेत. एक वर्ग आस्तिकाचा आणि दुसरा नास्तिकाचा. जीवन जगतांना ह्या दोन्ही वर्गात एक समान धागा आहे. एक म्हणतो गोविंद हवा तर दुसरा म्हणतो आनंद हवा. वास्तविक दोघांनाही हवे आहे ते एकच... ते म्हणजे न संपणारे सुख! दोघांची भाषा मात्र वेगळी आहे आणि ते मिळविण्याची दिशा वेगळी आहे. नास्तिक ते सुख बाहेरून विषयांच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतो तर आस्तिक तेच सुख आतून देवाच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतो.
सर्वसुख म्हणजेच पूर्णसुख शाश्वत असते, स्वतंत्र असते, अंतर्यामी असते. मुख्य म्हणजे ज्याचे त्यालाच ते भोगायचे असते. विषय मुळातच अपूर्ण आहेत, अशाश्वत आहेत आणि त्यांच्यातून सुख उपभोगायचे तर मन त्याजागी स्थिर होत नाही. मग विषयांतून 'सर्वसुख' कसे मिळणार? एक भगवंतच पूर्ण आहे, शाश्वत आहे. त्याचे विस्मरण झाल्यामुळे आपल्याला त्याच्या ठायी असणाऱ्या गोडीची चव चाखायला मिळत नाही म्हणून आवड नाही. त्यासाठी त्याचे स्मरण हवे आणि हे केवळ नामस्मरणानेच शक्य आहे. म्हणूनच पूर्णसुखाचा लाभ होण्यासाठी क्षणभरदेखील नामाशिवाय राहू नये. ह्या आपल्या म्हणण्याला ज्ञानदेव पुन्हा साही शास्त्रांचा आधार देत आहेत.
आपण रोजच्या जीवनात अनुभवतोच की Empty mind is Devil's abode. 'रिकामे मन हे सैतानाचे घर' असे आपण कितीही म्हणत असलो तरी हे रिकामपण घालवण्यासाठी आपण काय करतो? आपण संसाराचा पसारा वाढवत असतो. कार्यालयात आलो की संगणक चालू आणि त्याबरोबर 'मनोगत', 'चॅटींग' ह्यातून वेळ मिळालाच तर मग काम :)). घरी गेलो की "काय वैताग आहे ह्या कामाचा आणि प्रवासाचा" म्हणत शीण घालवायला दूरदर्शन संच सुरू करून सुखासाठी / आनंदासाठी शोध सुरू करतो. मग हा चॅनल बदल, तो चॅनल बदल करत "काय फालतू मालिका आहेत" म्हणत जेवायला तरी काय केले आहे पाहावे तर तेथेही "काय हे? काही नवीन नाही का?" म्हणत नाक मुरडायचे. परत येऊन मासिक, वर्तमानपत्र (?!) चाळत सामाजिक, राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि ह्यावर मित्रपरिवारात आपल्या मतांना दामटत बसायचे किंवा घरातील माणसांवर आपला राग काढायचा आणि मग थकल्या- भागल्या मनाने आणि आंबलेल्या शरीराने झोपी जाता जाता दिवसा राहून गेलेले एखादे काम आठवले की म्हणायचे, 'एका क्षणाचीही उसंत नाही. दिवसभर किती काम करतो.' आपल्या आयुष्यातही असेच घडते.
"बाळपणी खेळी रमलो, तारूण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर"
ही आपली व्यथा आहे. शेवटी "किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित" असे म्हणत जगाचा निरोप घ्यायचा. पुन्हा आहे तेच.
ज्ञानदेवांना रिकामा अर्धघडी राहूं नको यातून प्रापंचिक गोष्टींत मन अडकविणे अभिप्रेत नाही. ज्ञानदेवांसारखे संत, सद्गुरू आपल्याला असे मार्गदर्शन नक्कीच करणार नाहीत. संतांना अभिप्रेत असलेले सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे आणि भगवंत नामापासून वेगळा नाही हेही त्यांना माहीत आहे. नामधारकाने अर्धघडीही रिकामे राहू नये म्हणजे अखंड नामस्मरण करीत राहवे असेच ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. कारण ज्ञानदेवांना (आणि संतांनाही) माहीत आहे की,

लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥

आपण सुखासाठी जे व्यवहार करतो, संसाराचा पसारा गोळा करतो ते सर्व 'लटिके' आहे. बरेच जण जग खोटे आहे, नाशिवंत आहे, असार आहे म्हणत वैराग्याच्या खुळचट कल्पना मनात बाळगून जगाकडे पाठ फिरवतात. मी एका संन्यासी प्रवचनकारांना मिथ्या ह्या शब्दाच्या अर्थाबद्दल विचारले असता त्यांनी मला सांगितले neither real nor false. मी मिथ्या ह्या शब्दाचा अर्थ घेतो परिवर्तनशील. तत्त्वता जीव,जग आणि जगदीश एकच आहे. लटिके आहेत ते मानवी व्यवहार आणि खोट्या 'मी'वर आधारित संसार. सृ सरति इति संसार अशी संसाराची व्याख्या केली जाते. सरत सरत जाणारा तो संसार अशी नकारात्मक भूमिका घेण्याऐवजी "जग हे सत्य असून नित्य नूतन आहे" ही सद्गुरू श्री. वामनराव पै ह्यांची वास्तववादी भूमिका स्वीकारून जगणे अधिक हिताचे आहे. सुखाच्या अपेक्षेत जगाकडे पाहिले तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आपली व्यथा सार्थपणे मांडतो. ते म्हणजे
"किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥" सुखाचा शोध घेताना जग सुख देत नाही म्हणण्यापेक्षा विषयांतून सुख घेण्यात आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आड येतात हे विसरून चालणार नाही. जगात असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून मजेत जगा की. आपल्याला भूक लागली असता खायला न देता तत्त्वज्ञान सांगत राहिले तर? मात्र संतांना अभिप्रेत असलेले सुख म्हणजे
'जेथ दुजियाची चाड नाही । इंद्रियांचा पांगू न पडे काही । विषयाविण आनंद हृदयी । निजसुख पाही या नाव ॥'
संतांच्या सुखाचे स्थान आहे...
"सुख एक हेचि ठायी । बहु पायी संतांचे ॥"
"सुख या संतसमागमे । नित्य दुणावे तुझिया नामे ॥"
एकदा का सुखाचे स्थान नक्की झाले की मग ज्ञानदेव त्याच्या प्राप्तीचे उपाय पुढील ओव्यांतून स्पष्ट करतात.

नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहें ॥

संतांना अभिप्रेत असलेले सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे आणि भगवंत नामापासून वेगळा नाही. पण मानवप्राणी जन्माला आल्यापासून विषयांत सुखाचा शोध घेत फिरतो आणि
अंती "किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥" म्हणत जगाचा निरोप घेतो. भगवंताशिवाय सर्वसुखाची अपेक्षा करणे हे संतांना अभिप्रेत नाही. नामाशिवाय भगवंत हाती येणे कठीण आहे आणि संतसंगतीशिवाय नाम मुखात आणि मुखातून मनात भरणे शक्यच नाही. भगवंताला आपल्या जीवनात आणायचा असेल तर नामाशिवाय सुलभ मार्ग नाही. त्यासाठी संतसंग मात्र हवा. संतसंगाचा लाभ मिळण्यासाठी गाठी पुण्यसंचय असावा लागतो. पण कळत नकळत जमा झालेले पापाचे डोंगरच ह्या नामसाधनेच्या आड येतात. अशा अवस्थेत नाम घेण्याचा संकल्प म्हणजे निश्चय करून रिकामपणी तरी नाम घेत राहवे. रिकामपणी नामस्मरणाचा अट्टहासाने अभ्यास केला असता साधकाचे मन हळू हळू एकाग्र होऊ लागते. नामाचे दिव्य अनुभव येऊ लागताच सहजच नामाबद्दल प्रेम निर्माण होऊन नामस्मरणाचा छंद लागतो. त्याचा परिणाम म्हणजे हृदयात असणारा आनंद अंतःकरणात प्रत्यक्ष दिसू लागतो. संत हा अनुभव शब्दबद्ध करतात तो असा,
"अंतरीची ज्योति प्रकाशली दीप्ती । मुळींची जे होती आच्छादिली ॥
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये । उपमेसी देवू काय सुखा ॥
भगवंत हेच सर्वसुखाचे एकमेव साधन आहे हे एकदा स्वीकारले आणि त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण करणे हे साधन नक्की केले की त्या मार्गात येणाऱ्या अडचणींबाबत साधकाला सावध करण्याची जबाबदारीही ज्ञानदेव स्वीकारतात आणि सावध करताना सांगतात..

निजवृत्ती हें काढी सर्वमाया तोडी । इंद्रियांसवडी लपो नको ॥

नामस्मरणाचा अभ्यास चालू असता साधकाने जे पथ्य पाळायचे असते त्याचा ह्या ठिकाणी ज्ञानदेव उल्लेख करतात.

स्वरूपाच्या विसरामुळे माणसाच्या ठिकाणी अहंवृत्ति उदय पावते. हीच निजवृत्ति होय. अहंकारातूनच 'मी आणि माझे' आकाराला येते. त्यातच माणूस आसक्त होऊन राहतो. दुसरीकडे, सर्वसुखाची गोडी चाखायला मिळत नाही तोवर, विषयसुखात मन रमते. नाहीतरी 'दुधाची तहान ताकावर' हा मनुष्यस्वभावच आहे म्हणा. काहीतरी निमित्त काढून माणूस विषयसुखाकडे धावत राहतो. यावर उपाय म्हणजे संन्यस्त होऊन राहणे. संन्यस्त होणे म्हणजे 'मी आणि माझेपण विसरले ज्याचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण निरंतर ॥' असा संन्यास ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. म्हणजे भगवंतच आहे आणि जे काही आहे ते भगवंताचेच आहे अशी भावना दृढ करणे. ही भावना दृढ करण्यासाठी

तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥

हाच एक उपाय आहे. वास्तविक नामात रंगलेल्या साधकाला तीर्थव्रताची गरज नाही. कारण भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे. पण नामाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मात्र तीर्थव्रतांची आवश्यकता आहे. आपण नाही का पदवी घेऊन व्यवसाय सुरू केला तरी conferences attend करतो. आपल्या व्यवसाय बंधू-भगिनींशी वैचारिक देवाणघेवाण करून आपली व्यावसायिक समज आणि ज्ञान वाढवून पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय करतो. अगदी तसेच तीर्थाटनांमध्ये निरनिराळ्या संतांची, नामधारकांची भेट होते, आत्मचर्चा होते आणि आपल्या जीवनाला आध्यात्मिक वळण लागते.
भगवंतप्राप्तीसाठी चित्त शुद्ध असणे फार आवश्यक आहे. चित्त शुद्ध झाल्याची खूण म्हणजे करुणा, दया, क्षमा, शांती ह्या दैवी गुणांची अंतःकरणात वृद्धी होणे.
"दया क्षमा शांति । तेथें देवाची वस्ती ॥" हे तर आपल्याला लहानपणापासूनच ऐकायला मिळते. खालील अभंग ह्या दैवी गुणांचा साक्षात्कारच करवतो.
"निवैरता सर्वांभूतीं । दया शांति आणि करूणा ॥
केली कृपा नारायणे । ऐशी चिन्हें उमटता ॥"
नामस्मरणाने चित्तशुद्धी सहजच होते आणि अंतःकरण दैवी गुणांनी भरून आणि भारून गेले की अशा अंतःकरणात भगवंत प्रगट होतो. तुकाराम महाराजांनी तरी वेगळे काय सांगितले?
"बैसोनी निवांत शुद्ध कऱी चित्त । तयां सुखा अंत नाही पार ॥
येवोनी अंतरी राहिल गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥"
किंवा
"नलगें सायास जाणें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥"
या दैवी गुणांचे संवर्धन केले तर माणसाचे मनच तीर्थ बनतें आणि भगवंत स्वतःच आनंदाने वास्तव्य करतो.

शेवटच्या ओवीत ज्ञानदेव नामसाधनेतील आपला अनुभव सांगतात,

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥

ज्ञानदेव स्वतः ज्ञानी होते, योगविद्येत पारंगत होते. योगमार्गाने आणि ज्ञानमार्गाने जे साधायचे ते भगवंताच्या नामानेही सहज साधता येते हेंच ज्ञानदेवांना हरिपाठाच्या अभंगातून सांगायचे आहे.
योगाच्या अभ्यासाने जी समाधी साधली जाते तिला ताटस्थ्य समाधी म्हणतात. नामाच्या द्वारे जी समाधी मिळते ती संजीवन समाधी. पहिल्या समाधीत योगी आपला 'मी' स्वरूपात विरवून टाकतो. त्या अवस्थेत त्याचा देह निश्चेष्ट राहून त्याची सर्व इंद्रिये तटस्थ असतात. काही वेळाने ह्या समाधीचा भंग होतो आणि योगी पुन्हा देहभानावर येतो.
नामस्मरणाने मिळणारी समाधी ही संजीवन समाधी आहे. या समाधीत साधकाचा 'मी' स्वरूपात विरून जात नाही, इंद्रिये तटस्थ होत नाहीत तर याच्या उलट त्याचे आनंदघन स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात प्रगट होऊन जाणीवेची सर्व अंगे आनंदाने भरून टाकतात. या स्थितीत साधकाचा 'मी' आनंदस्वरुपात डुंबतो.
या समाधी स्थितीत साधकाची इंद्रिये तृप्त व शांत झालेली असतात व त्याचा देह पूर्ण कार्यक्षम असतो. या संजीवन समाधीत असणारा नामधारक जगात राहून जगापासून अलिप्त असतो आणि लौकिक दृष्ट्या तो इतर सर्व माणसांसारखा दिसत असला तरी तो त्यांच्यापेक्षा आगळा असतो. ज्ञानदेवांनीच वर्णन केले आहे,
" ते चालते ज्ञानाचे बिंब । अवयव सुखाचे कोंब ॥"

ज्ञानदेव सांगतात हरिपाठाने संजीवन समाधी मिळते. हे ज्ञान मला निवृत्तीनाथांच्या कृपेने लाभले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.
संजीवन समाधीचा लाभ केवळ नामस्मरणाने लाभू शकतो हा ज्ञानदेवांचा अनुभव तुम्हा-आम्हाला यावा म्हणून ज्ञानदेव आवर्जून सांगतात...


हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"


॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥

http://www.manogat.com/node/258संतांचा उपदेश

श्रीनि,
ओशोंच्या पारमार्थिक अधिकाराबद्द्ल माझ्या मनात जराही किंतु नाही. तू लिहितोस की,
ओशो (रजनीश) म्हणतात (आणि जे मला पटते), की संतांनी ज्या सत्याबाबत आपले वक्तव्य दिले, ते सत्य त्या संतांना त्यांच्या शोधामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे गवसले होते. पण नंतर, बर्‍याच लोकांनी, स्वतः शोध न घेता, संतांचे हे वक्तव्य 'सत्य' म्हणून स्वीकारले.

लोकांनी संतांचे वक्तव्य "सत्य"म्हणून स्विकारले पण त्याची अनुभूती घेण्याचे प्रयत्न केले नाहीत हा लोकांचा दोष आहे. संतांचा नाही. PhD करणे हा शिक्षणाचा अंतिम टप्पा असतो. पण कुणी एकदम PhD च्या वर्गात जावून बसतो का?म्हणून का अक्षरओळख करुन देणारे पहिलीचे वर्गच बंद करायचे?
तद्वत् संतांनी अंतिम सत्य जाणले तरी सर्वसामान्य माणसाला पारमार्थिक कसे बनविता येईल ह्याचा सखोल विचार केला होता. "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,तेणे मुक्ति चारी साधियेल्या " सांगणारे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या शेवटी "रिकामा अर्धघडी राहू नको" हे सांगायला विसरत नाहीत. "हरी मुखे म्हणा,हरी मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी" हे सांगणारे ज्ञानेश्वर आणि अमृतानुभवासारखा अजातवाद सांगणारा ग्रंथ लिहिणारे ज्ञानेश्वर एकच. पण "जैसा ज्याचा अधिकार तैसा करु उपदेश" हे फक्त संतांनाच कळत होते. "सुख पाहता जवापाडे;दु:ख पर्वताएव्हढे" म्हणणारे तुकाराम शेवटी "आनंदाचे डोही आनंद तरंग,गावू परमानंद मनासंगे" बोलू धजावतातच ना!
"ब्रह्म सत्य जगत मिथ्या" ही वेदांताची अनुभुती आहे. सत्य ह्या शब्दाचा अर्थ सातत्याने असते ते असा सांगितला जातो. मिथ्या म्हणजे जे परिवर्तनशील आहे ते किंवा neither real nor false असाही सांगितला जातो. लोकांनी साधक बनून नामाची कास धरावी आणि सत्यापर्यंत पोहचावे असाच संतांचा हेतू आहे.पण "कैसे हे आंधळे जन न देखती खर्‍या देवा"असे संतांना नाईलाजास्तव लिहावे लागते. सर्वसामान्य जनता साध्या-साध्या गोष्टीही करायच्या टाळतात.तरी संत उपदेश करण्याचे आपले कार्य सोडत नाहीत. कारण " बुडती हे जन न देखवे डोळा,हितांच्या कळवळा येतो त्यांच्या" हा संतांचा स्थायीभाव असतो.
संतांनी समाजाला निष्क्रिय केले ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. झोपेत असणारा मनुष्य लौकीक अर्थाने काहीच करत नाही.म्हणून त्याला कुणी झोपूच दिले नाही तर?तर तो उद्याचे कार्य व्यवस्थित करु शकेल का? वस्तुत: झोपेत असणारा माणूस उद्याच्या कार्यासाठी ऊर्जास्रोत गोळा करीत असतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
मनाचे सामर्थ्य फक्त संतांनाच कळले होते.म्हणूनच "मन करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण " हे तुकोबाराय सांगतात आणि "उन्मनीच्या सुखा आत पांडुरंग भेटी देत" हे सांगायलाही विसरत नाहीत.


"मीच्या वेलांटीचा सुटो-सुटो फास,वेढा क्षितिजास पडो त्याचा" हे लिहिणारे विं.दा. आणि "अहं ब्रह्मासी"म्हणणारे वेदांती ह्यांच्यात भेद तो कोणता ???