Wednesday, November 01, 2006

फिटे संशयाचे जाळे

फिटे संशयाचे जाळे झाले मोकळे मीपण
तनामनातून वाहे एक चैतन्य चैतन्य॥धृ॥

ज्ञान जागे झाले सारे नवविधा जाग्या झाल्या
आत्मसूर्य प्रगटता संगे जाणिवा जागल्या
एक अनोखी प्रतिभा आली भरास भरास॥ १॥

नाम घेवूनी उन्मनी झाली मनाची ही गती
ओवी जुनीच नव्याने आली भक्तांच्याही ओठी
बोधापूर्वीचे पालटे जग उदास उदास॥२॥

झाला आज ब्रह्मानंद जुने कालचे अज्ञान
'अहं' पणाला नामीचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा आनंद आनंद॥ ३॥

घेता-- (एक विडंबन )

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्यापिवळ्या साडीवरुन
"एंगेज"चा सिग्नल घ्यावा

मुंबईतील दादांकडून
पायांसाठी "स्केटस्" घ्यावी
शहाण्या-जाणत्या वक्यांकडून
वेडेपिसे विचार घ्यावे

पुस्तकांतील प्रश्नांसाठी
"गाईड"कडून मदत घ्यावी
पिसाळलेल्या म्हातारीकडून
भांडणासाठी निमित्त घ्यावे

भरलेल्या लोकलमधुनी
पाकीटमारीचे शिक्षण घ्यावे
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस
देणाऱ्याला विसरुन जावे.

विं.दा.करंदीकर ह्यांची माफी मागून

लग्न म्हणजे ...

लग्न म्हणजे ...
लग्न म्हणजे... लग्नच असते.
दोन घरांना जोडणारे अंगण असते.

लग्न म्हणजे...
तिच्या घरासाठी,त्याची वणवण असते.

लग्न म्हणजे...
एकमेकांसाठी जगण्याची ओढ असते.

लग्न म्हणजे...
ऋणातून मुक्त होण्याची संधी असते.

लग्न म्हणजे...
थोडेसे रुसणे,बरेचसे फुगणे असते.

लग्न म्हणजे...
काही तुझे-माझे,बरेचसे आपले असते.

लग्न म्हणजे...लग्न म्हणजे... प्रेमच असते.
तुझे आणि माझे एकच असते.

लग्न म्हणजे...लग्न म्हणजे...लग्नच असते.
विवाहोत्तर प्रेमही शाश्वतच असते.

मरण जगला !

मरण जगला, मरण जगला
धनी कैवल्याचा तोचि झाला ॥ धृ ॥
मन आणि प्राणाचा साधता मेळ
नादब्रह्म नभी हुंकारला ॥ १ ॥
बहरता मुक्तीफुले इंद्रियामाजी
आसमंत सारा गंधाळला ॥ २ ॥
बिलगता जाणीव असिनाथासी
मी-तू पणा सारा पांगुळला ॥ ३ ॥
आनंदलहरी उठता अंतरी
ब्रह्मानंदी स्वामी विराजला ॥ ४ ॥

जवळचे सत्य

आषाढातील हिरवळीतून रुणझुणणारी पाऊलवाट
येते आडवळणाने माझ्या भंगलेल्या जमिनीत.
झाकून सारे डोळ्यांतील रुपेरी इंद्रधनुष्य
श्रावणधारा बरसतात,फक्त बरसतात.
गुलाब आता फुलणारच नव्हते,पण
साधे रानगवतही उगवले नाही.
झाला तो फक्त चिखल अन चिखल
माझ्या भंगलेल्या कसहीन जमिनीत
त्या चिखलात रुतलेला मी निस्तेज
पाहतो दूर-दूर पसरलेले क्षितिज
जेथे आकाश जमिनीला टेकलेले भासते
पण 'जवळचे सत्य'काही वेगळेच सांगते.