Tuesday, October 31, 2006

माझी आवडती कविता-- औदुंबर

ऐल तटावर, पैल तटावर, हिरवाळी घेऊन
निळा सावळा झरा वाहतो, बेटांबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर


साहित्यशारदेच्या मंदिरी "बालकवी" ह्या टोपण नावाने आपली साहित्यज्योत तेवत ठेवणार्‍या श्री.ठोंबरे ह्या नंदादीपाची "औदुंबर" ही एक अष्टपुष्पांनी गुंफलेली कविता! मुळातच निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या कवीने आपल्या विशिष्ट शैलीने आणि शब्दांच्या कुंचल्याने रेखाटलेले हे एक जीवंत,रेखीव निसर्गचित्र आहे. ह्या निसर्गचित्रातच सुखदु:खाच्या पलिकडे गेलेल्या विरागी आणि स्थितप्रज्ञ वृत्तीचेही दर्शन औदुंबराच्या प्रतिकातून ह
बालकवींना निसर्गात काय दिसले? तर एक झरा बेटाबेटांतून वाहतो आहे‌. शेतमळ्यांच्या गर्दीतून निघालेली पायवाट डोहाकडे जात आहे.टेकडीपलिकडे चार घरांचे गाव आहे आणि हे सर्व दृष्य नेहमी पाहणारा औदुंबर! एवढेसेच हे निसर्गदृष्य! मातीच्या मूर्तीला सोन्याचे अलंकार, रंगीबेरंगी वस्त्रे,आकर्षक नयन इ. आपल्या रंगसंपत्तीतून कुंचल्याच्या साहाय्याने काढून मूर्तिकार ती मूर्ती मनोवेधक बनवतो. तसेच बालकवींनीही निसर्गातील अनेक रंग,रेखा,आकृती आपल्या चित्रमय शब्दांत टिपून त्या निसर्गात "जीव"ओतला आहे. बालकवींनी योजलेल्या 'ऐल' आणि 'पैल' ह्या दोनच शब्दांनी ही कविता रसिकांचे मन आकर्षित करुन घेते.नकळतच ही कविता गाण्याचा आपल्याला मोह होतो.टेकडीच्या कुशीत झोपलेल्या गावाला छोटेसे, लहानसे इत्यादी शब्द न वापरता 'चिमुकले'असा चपखल शब्द बालकवी वापरतात. शेतमळ्यासंबंधी आलेले 'हिरवी गर्दी' हे दोनच शब्द शेतमळ्यांबद्दल कितीतरी सांगून जातात. 'अडवी-तिडवी' ह्यातून पाऊलवाटेचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. प्रत्येक दोन ओळींत साधेलेला यमक आणि 'पायवाट पांढरी तयातूनी अडवी तिडवी पडे' या ओळीत झालेली प आणि ड ह्यांची पुनरावृत्ती आणि 'झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर' या ओळीत चटकन नजरेत भरणारा 'ळ' यांमुळे अनुप्रास अलंकाराची खुलावट या कवितेते दिसते.
'काळा' हा शब्द मनाचा किती विरस करतो हे या ठिकाणीही जाणवते.कविता डोळ्यांसमोर येवून वाचतांना मन फुललेले असते.पण लाटांवर पसरलेला काळीमा पाहताच रजनीच्या काळ्या बुरख्याने कोमेजून जाणार्‍या फुलांप्रमाणे मन कोमेजून जाते. सारी कविता भकास वाटू लागते. या ओळीमुळे संपूर्ण कवितेला औदासिन्याची झळ लागली आहे.मन नकळत जीवनाचे गूढ उकलण्यास प्रारंभ करते. मनात विचार येतो, " या झर्‍याप्रमाणे स्वछंदीपणे फिरणार्‍या आपल्या जीवनप्रवाहावर एखाद्या औदुंबराची छाया तर पडणार नाही ना?" बालकवींना या काळीम्यात कोणता गोडवा आढळला असेल?

या विचारांत मन गढून जाते.


प्रे. महेश
झाकळुनी जळ गोड
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

अश्या त्या शेवटच्या ओळी आहेत. ह्यात 'झाकळुनी जळ' आणि 'गोड काळिमा पसरी लाटांवर' असा अन्वय न लावता 'झाकळुनी जळ गोड' आणि 'काळिमा पसरी लाटांवर' असा अन्वय लावायला हवा असे मला वाटते. तसे केल्याने 'गोड पाण्याला झाकोळून आपला काळिमा लाटांवर पसरतो ....' असा सुसंबद्ध अर्थ लावता येईल.

चू. भू. द्या. घ्या.


महेश,
आपण लावलेला अर्थ अधिक सयुक्तिक वाटतो मलाही.

मी"गोड" हे विशेषण नामाच्या आधी हवे ह्या हिशोबाने "गोड काळिमा" असा भेद केला होता.

निरोप तव घेता

नकळत छेडल्या तारा मधुर गाती
युगायुगाची अनामिक अपुली नाती
नसतील आता ती अवखळ गाणी
राहिल्या त्या फक्त धुंद आठवणी
देशील निरोप मज तू प्रेमाने जरी
कसे लपवू दु:ख सांग घेतांना अंतरी
डोळ्यांतील बंध थिजल्या आसवांचे
जोडू देत धागे आपुल्या अंतर्मनीचे
नसशील आता जरी तू माझ्या संगती
यशात माझ्या कोंदल्यात तुझ्याच स्मृती

कळले मलाही आता

उमगली न भाषा तव नयनांतील ओढीची

स्वातीथेंबाचे भाग्य न लाभल्या हास्याची

शरम वाटते आता माझ्याच शरमेची

नको तेव्हा अबोल झाल्या भावनांचीकबूतराच्या चोचीत चोच घालू पाहता

अडखळतो मीच तप्त वाळूत तापता

पौर्णिमेच्या चांदव्याचे दूध पिवू जाता

दिसतात नयनांतील तुझ्या अश्रू आताम्हणूनी,तुझी माझी प्रीत हातीच नव्हती

आठवेल गीत तुला,राहिले तेव्हढेच हाती

विसर हिरव्या चुढ्यात ती अबोल नाती

कळले मलाही आता चूक माझीच होती

प्रभाते मनी

अलगद मिटल्या कोमल फुलात
भ्रमर रमला मधुसेवनात

सुधांशुच्या ओल्या प्रेमात
रात्र न्हाली शृंगारात

दवात भिजली सुखद पहाट
भिजून चिंब तांबूस वाट

सावरिता केशसंभार रजनी
जागल्या आठवणी पुन्हा मनी

हळूच गाली चढली लाली
तीच पूर्वेला पसरून गेली